बल्लारपूरचे एसएनडीटी उपकेंद्र बनेल आधुनिक शिक्षणाचे शक्तिकेंद्र!

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

मातृत्व संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक सुविधांसाठी ₹७ कोटींचा निधी मंजूर करण्याची आ.मुनगंटीवार यांची मागणी;शासकीय तंत्रनिकेतन मूलसाठी जमीन खरेदीला ₹५.५० कोटींची तरतूद करण्याची सूचना

ऑक्सफर्ड, केंब्रिजसह जगातील नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार करून ६२ अभ्यासक्रमांना जागतिक आयाम देण्याचे आ.मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर : बल्लारपूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या उपकेंद्राला अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज करून ते आधुनिक शिक्षणाचे शक्तिकेंद्र बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. विद्यार्थिनींना काळाच्या गरजेनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना बैठकीत मांडल्या. उपकेंद्रातील अत्याधुनिक कामांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ₹७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी, शासकीय तंत्रनिकेतन मूलच्या इमारतीसाठी खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी ₹५.५० कोटींची तरतूद तसेच ६२ अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करून त्यांना जागतिक आयाम देण्याच्या दिशेने आ.मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्या समवेत एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात बांधकाम व विकासकामांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी वसूमना पंत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक राजेश इंगोले, उपकुलसचिव बाळू राठोड, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता संजोग मेंढे, कार्यकारी अभियंता (विद्युत) पूनम वर्मा आदी उपस्थित होते.

बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विविध सुविधांना आधुनिक आणि नाविन्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी मातृत्व संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक कामे करण्यात यावीत, अशी सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली. या कामांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ₹७ कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थिनींना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर आ.मुनगंटीवार यांनी भर दिला.

शासकीय तंत्रनिकेतन मूलच्या इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेली खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी ₹५.५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. जमीन उपलब्ध झाल्यानंतर तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामाला गती देऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र भविष्यात शिक्षण, कौशल्य आणि संशोधनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित व्हावे, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

६२ अभ्यासक्रमांचे मूल्यांकन करून गुणवत्तावाढीवर भर

एसएनडीटी महिला विद्यापीठातील ६२ अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती घेऊन त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशी सूचना आ. मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांना दिली. अभ्यासक्रमांची गुणवत्ता, बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील कौशल्यांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थिनींना केवळ पदवीपुरते शिक्षण न देता त्यांना आधुनिक कौशल्ये, संशोधनाची दृष्टी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता मिळावी, या दृष्टीने अभ्यासक्रमांचे मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नामांकित विद्यापीठांशी एमओयूचा प्रस्ताव

एसएनडीटी महिला विद्यापीठाने जगातील ऑक्सफर्ड, केंब्रिज यांसारख्या दहा नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार (एमओयू) करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी केली. यामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानव्यवस्थेशी जोडले जाण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे आ.मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

केंद्रीय महिला विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईला केंद्रीय महिला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच नवी दिल्ली येथे महामहीम उपराष्ट्रपती तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या दर्जामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तारासोबतच संशोधन, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक सहकार्याला व्यापक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अनुषंगाने केंद्रीय महिला विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून, एसएनडीटी महिला विद्यापीठाला केंद्रीय महिला विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हादजी जोशी यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उपकेंद्र परिसरातील विविध प्रकल्पांचा आढावा

बैठकीदरम्यान एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्र परिसरात प्रस्तावित व सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचीही माहिती देण्यात आली. यामध्ये ईएसआयसी हॉस्पिटल, एसआरपीएफ कॅम्प, आयुष रुग्णालय आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक पायाभूत सुविधांना व्यापक बळकटी मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.बैठकीनंतर प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासमवेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्र परिसरातील सुरू असलेल्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. इमारतीच्या भौतिक संसाधनांसाठी आवश्यक निधी, बांधकामाचा दर्जा, भविष्यातील गरजा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *