चिचपल्ली येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ

चंद्रपूर, दि. 18 : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने चिचपल्ली येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

चंद्रपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी श्री. पाल, गटशिक्षण अधिकारी श्री. यादव, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. यारेवार, विस्तार अधिकारी (पंचायत) मिनाक्षी बन्सोड, स्वच्छता समन्वयक श्री. खानझोड तसेच तालुका स्वच्छता व्यवस्थापक आशिया शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाची उद्दिष्टे, अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच ग्रामस्तरावरील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, आरोग्य संस्था तसेच इतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती किंवा अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने जनजागृती करून नागरिकांचा सहभाग वाढवावा. तसेच अभियानातील उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘सेवा संकल्प’ मधून शासकीय योजनांची जनजागृती : ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, नागरिकांना आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन करणे तसेच शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष स्वच्छता मोहीम : प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचपल्ली येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातून आरोग्य केंद्र परिसराची साफसफाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी आणि वादविवाद स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या. स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांपर्यंतही स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *