लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत नागाळा येथे शासकीय योजनांबाबत जनजागृती

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने ‘लोकसंवाद–2026’ जनजागृती कार्यक्रम नागाळा (ता. चंद्रपूर) येथे आयोजित करण्यात आला. नवयुवक गणेश मंडळ, नागाळा यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पोलीस पाटील नथू घटे, संभाजी येरगुडे, नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष आदित्य निकोडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. यापूर्वीही शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कर्जमाफी योजना राबविल्या आहेत. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटअंतर्गत लाभ तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ अशा तरतुदींचा समावेश आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 48 हजार 68 शेतकरी पात्र ठरले असून पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – गजानन पवार
कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार यांनी विविध शेतकरी कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन केले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या व्याप्तीत बदल करण्यात आला असून भूमिहीन शेतमजूर तसेच महिला शेतकऱ्यांनाही यामध्ये लाभ देण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अपघाती मृत्यू, सर्पदंश, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, विजेचा धक्का तसेच उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी उत्पादक कंपनी, फळबाग लागवड आणि शेततळे योजनेसह कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती श्री. पवार यांनी उपस्थितांना दिली.

शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ‘लोकसंवाद–2026’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *