राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू अड्ड्यावर धाड, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील घटना , 11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ परिसरात हॉटेल बजेट येथे सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान व खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान एकूण 11 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच चुन्नू विजयपालसिंग परमार (मॅनेजर) हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 11 ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. दारू अड्ड्याचा मालक आशिष चांदेकर हा कारवाईदरम्यान फरार झाला असून त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याच्याविरुद्ध पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *