जिची समाधी बांधली, तीच वर्षभरानंतर जिवंत घरी परतली

दस्सो मुक्का कांदो ही महिला चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी-बाळापूर परिसरात भटकंतीच्या अवस्थेत होती आढळली, तिला स्थानिक कार्यकर्त्यांनी आश्रमात केले होते दाखल, यावेळी काढलेला व्हिडिओ वायरल झाल्यावर कुटुंबीयांनी पत्ता काढून महिलेला गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मोहर्ली येथे नेले घरी

नियतीने दूर नेलेली व्यक्ती पुन्हा आपल्या माणसांमध्ये परतण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग उघडकीस आला आहे . गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मोहर्ली येथील ६० वर्षीय दस्सो मुक्का कांदो नामक महिला या वर्षभरापासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी छत्तीसगडमध्ये सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला असावा, असा समज झाल्याने कुटुंबीयांनी तेरवी करून त्यांच्या स्मरणार्थ समाधीही बांधली.

दरम्यान, दस्सो मुक्का कांदो या तळोधी-बाळापूर परिसरात भटकंतीच्या अवस्थेत असल्याचे आढळून आल्या होत्या . नागभिड तालुक्यातील नांदेड येथील डोमाजी आधार फाउंडेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज आश्रमाचे सदस्य परमेश्वर मडावी यांनी तत्काळ त्यांना आश्रमात आणले. आश्रमात दस्सो मुक्का कांदो यांची काळजी घेत उपचार करण्यात आले. नागपूर येथील मनोरुग्ण रुग्णालयातही तपासणी करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. हा व्हिडिओ कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांची ओळख पटली. आश्रमाच्या परमेश्वर मडावी यांच्यासह अन्य सदस्यांनी सुमारे पाच तासांचा प्रवास करून मुक्का कांदो यांना मोहर्ली येथे कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवले. वर्षभरानंतर पत्नी, आई आणि मुलीला जिवंत पाहताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले . त्यावेळी गावातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत सामाजीक संस्थेचे आभार मानले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *