गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील हिंदू – मुस्लिम ऐक्यासाठी ख्यात असलेले सुफी संत हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ आणि सीमावर्ती भागातील त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. हजरत जिलानी सरकार हे हिंदू-मुस्लिम समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान होते. त्यांचे मूळ नाव हबीब मोहसीन होते. त्यांचा जन्म हैदराबादजवळ झाला होता.
ते गडचिरोली येथे राहत होते आणि त्यांची खानकाह (सुफी आश्रम) गडचिरोलीत आहे. ते सर्वधर्मभावासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ओळखले जात होते. गडचिरोली येथील त्यांची खानकाह ही संकटात असलेल्या तसेच विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेचे आणि आधाराचे ठिकाण म्हणून ओळखली जात होती. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी विविध समाजातील भाविक येथे येत असत. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनुयायांकडून व्यक्त होत आहे. गडचिरोली शहरात त्यांचा अंत्यविधी होणार असल्याने उसळणारी गर्दी लक्षात घेता गडचिरोली पोलीस प्रशासनाने वाहतुक व्यवस्थेत बदल केले आहे.
