पोलीस कोठडीत असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत तीन पोलिसांसह आरोपी जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील एका आरोपीने पोलीस कोठडी रिमांडदरम्यान स्वतःवर टोकदार लोखंडी टोच्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत आरोपीसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२६, १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोरा पोलीस ठाण्यात विनोद शामराव सोयाम (वय ४०) विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याला ९ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संध्याकाळच्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या परिसरात गणेश मंडळांची बैठक सुरू असल्याने तपास अधिकारी मनीष तालेवार यांनी आरोपीला तपास पथकाच्या खोलीत जाण्याचे आदेश दिले. तेथे आरोपीकडे चौकशी सुरू असताना आरोपीने, “तुम्ही काय पोलीस आहे, मी फसवणूक केलेली रक्कम शोधून काढा व रिकव्हर करून दाखवा,” असे आव्हानात्मक शब्द उच्चारले व यानंतर आरोपीने अचानक टेबलावर ठेवलेला लाकडी मुठीचा लोखंडी सळाखीचा टोकदार टोचा हातात घेत स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीच्या पोटावर व मानेवर खरचटल्याच्या जखमा झाल्या. तसेच पोउपनि मनीष तालेवार यांच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ, पोहवा संदीप मुळे यांच्या उजव्या हाताच्या पंजावर आणि पोअं विशाल राजुरकर यांच्या डाव्या हाताच्या पंजावर खरचटल्याच्या जखमा झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *