‘माझ्या अंगात दैवी शक्ती, पैसे डबल होतील!’; भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकवून २५ लाख ९० हजारांचा गंडा

चंद्रपुरात तीन भोंदू महिलांना अटक; ‘धुनीची पावडर’, तावीज आणि जादूटोण्याच्या नावाखाली आजारी पतीला बरे करण्याचे आमिष

चंद्रपूर : ‘माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. धुनीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास आणि तावीज वापरल्यास तुमचे आजारी पती पूर्ण बरे होतील. घरातील पैसेही डबल होतील,’ अशा भुलथापा देत एका कुटुंबाची तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम अशी आहेत.

आजारी पतीला बरे करण्याचे आमिष

चंद्रपूर शहरातील जोड देऊळ, पठाणपुरा वॉर्ड परिसरातील वैशाली अनिल खणके यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. इरई नदीवरील पुलासाठी वैशाली यांच्या कुटुंबाची जमीन संपादित झाली होती. त्याबदल्यात त्यांना ७१ लाख रुपये भरपाई मिळाली होती. पती आजारी असल्याने घरातील आर्थिक व्यवहार वैशालीच पाहत होत्या.

दरम्यान, त्यांच्या शेजारी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या विद्या निमजे हिची वैशाली यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत विद्याने वैशाली यांच्या मनात अंधश्रद्धेचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली.

‘तुमच्या पतीला मी पूर्ण बरे करू शकते,’ असे सांगून तिने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर हप्त्याने आणखी ५ लाख २५ हजार रुपये चेकद्वारे घेतल्याचा आरोप आहे.

‘धुनीची पावडर’ आणि तावीजाचा खेळ

विद्या निमजे वारंवार वैशाली यांच्या घरी येत असे. ‘धुनीची पावडर आणि एक चिठ्ठी पाण्यात टाकून प्या, प्रकृती सुधारेल,’ असे सांगून ती अंधश्रद्धेचा प्रभाव निर्माण करत होती.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘घराचे कल्याण होईल,’ असे सांगत तिने वैशाली यांच्याकडील सोन्याचे कानातले आणि गळ्यातील पोत काढून घेतल्याचा आरोप आहे.

यानंतर २४ जुलै रोजी विद्या वैशाली यांना बँकेत घेऊन गेली. तेथे त्यांना १० लाख रुपये रोख काढण्यास सांगून ती रक्कम स्वतःकडे घेतली. दुसऱ्याच दिवशी, २५ जुलै रोजी पुन्हा घरी येत ‘घर खरेदीसाठी ठेवलेले पैसे’ असल्याचे सांगून आणखी १० लाख रुपये घेतले आणि ती निघून गेली.

फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव

विद्याने घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम शाहिस्ता अंजुम आणि शबनम यांच्याकडे दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र कोणताही फायदा न झाल्याने वैशाली यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी ‘माझ्याकडे पैसे नाहीत, खर्च झाले,’ अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वैशाली यांनी चंद्रपूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *