गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचा निरोप समारंभ संपन्न

50 आत्मसमर्पित नक्षल्यांचे त्यांच्या मूळ जिल्ह्रात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी गडचिरोली पोलीसांचा पुढाकार

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी नक्षल विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून 819 नक्षलवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत पाठविण्यात येऊन त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत.

यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयं रोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अतंर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारख्या आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित नक्षल्याना कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *