लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (एलकेएएमएच), हेडरी येथे उच्च जोखमीच्या तिहेरी गर्भधारणेचे यशस्वी व्यवस्थापन करण्यात आले असून आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे तीन अकाली जन्मलेल्या बाळांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली.
मांगेर गावातील 32 वर्षीय मातेनं मार्च 2026 मध्ये प्रथमच एलकेएएमएच रुग्णालयात उपचारासाठी भेट दिली होती. त्यानंतर संपूर्ण गर्भधारणेदरम्यान त्या नियमित प्रसूतीपूर्व वैद्यकीय देखरेखीखाली होत्या. अल्ट्रासाऊंड तपासणीत त्यांच्या गर्भात तीन बाळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही गर्भधारणा उच्च जोखमीची असल्याने विशेष आणि सातत्यपूर्ण देखरेखीची आवश्यकता होती.
11 ऑगस्ट रोजी पोटात आणि पाठीच्या खालच्या भागात हलक्या वेदना जाणवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल असताना वैद्यकीय पथकाने नियमित अल्ट्रासाऊंड तपासणी, गर्भातील बाळांच्या हृदयगतीचे निरीक्षण तसेच इतर आवश्यक तपासण्यांद्वारे माता आणि तिन्ही बाळांवर सातत्याने लक्ष ठेवले. संभाव्य अकाली प्रसूती लक्षात घेऊन बाळांच्या फुफ्फुसांच्या विकासासाठी आवश्यक औषधे देण्यात आली. तसेच आपत्कालीन शस्त्रक्रियेची शक्यता लक्षात घेऊन रक्ताचीही आगाऊ व्यवस्था करण्यात आली.
माता आणि त्यांच्या कुटुंबीयांना गर्भधारणेच्या उच्च जोखमीबाबत, अकाली प्रसूतीच्या शक्यतेबाबत तसेच नवजात बाळांना विशेष वैद्यकीय देखभालीची आवश्यकता भासू शकते, याबाबत नियमितपणे समुपदेशन करण्यात आले.
21 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पुढील तपासणीत बाळांच्या रक्ताभिसरणात आणि हृदयगतीमध्ये चिंताजनक बदल आढळून आले. हे बदल गर्भातील बाळांना संभाव्य त्रास होत असल्याचे संकेत देत होते. प्रसूतीला विलंब झाल्यास निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने तातडीने आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
गर्भधारणेचे 32 आठवडे आणि 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत तिन्ही बाळांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली.
अकाली जन्म आणि कमी वजनामुळे तिन्ही नवजात बाळांना तत्काळ रुग्णालयाच्या विशेष नवजात देखभाल विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपचार आणि वैद्यकीय मदत दिली जात आहे. सध्या तिन्ही बाळे नवजात देखभाल पथकाच्या देखरेखीखाली चांगली आहेत.
मातेनं आपत्कालीन शस्त्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला असून शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रियेनंतरचे उपचार आणि सहायक देखभाल सुरू आहे.
या आपत्कालीन प्रसूतीचे यशस्वी व्यवस्थापन दोन स्त्रीरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ आणि दोन बालरोगतज्ज्ञांच्या समन्वित बहुविषयक पथकाने केले. या प्रक्रियेत ऑपरेशन थिएटर, नर्सिंग आणि नवजात देखभाल पथकाचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
नियमित प्रसूतीपूर्व तपासणी, रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेली बारकाईची निगराणी, धोक्याच्या संकेतांची वेळेवर ओळख आणि तातडीने करण्यात आलेल्या वैद्यकीय हस्तक्षेपामुळे माता आणि तिन्ही बाळांसाठी सुरक्षित परिणाम सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
उच्च जोखमीच्या या प्रसूतीचे यशस्वी व्यवस्थापन केल्याबद्दल वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन म्हणाले, “तिन्ही बाळांची सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप आणि समर्पित प्रयत्न केल्याबद्दल मी एलकेएएमएच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नवजात बाळांना आणि त्यांच्या मातेला उत्तम आरोग्य व लवकर बरे होण्यासाठी मी शुभेच्छा देतो. एलकेएएमएच रुग्णालय गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्या समुदायांची आम्ही सेवा करतो त्या समुदायांमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.”
या उच्च जोखमीच्या तिहेरी गर्भधारणेच्या यशस्वी व्यवस्थापनातून हेडरी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आसपासच्या दुर्गम आणि आदिवासी भागांतील कुटुंबांना वेळेवर आणि दर्जेदार माता व नवजात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याप्रती एलकेएएमएच रुग्णालयाची कटिबद्धता अधोरेखित होते.
