चंद्रपूर वनविभाग जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षात पकडल्या गेलेल्या वाघांच्या सुरक्षित आणि मजबूत पिंजऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यात वाघ आणि वन्यप्राणीविषयक संघर्षात अंतिम अधिकार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना आहेत. जिल्ह्यात कुठेही समस्या ठरलेला वाघ अथवा बिबट जेरबंद झाल्यावर त्याचे वर्तन समजून घेत त्याची शुश्रूषा करण्यासाठी शहराच्या वेशीवर वन्यजीव शुश्रूषा केंद्र उभारले गेले आहे.
या केंद्रात केवळ 7 मजबूत काँक्रीट एनक्लोजर आहेत. आणि केंद्रात तब्बल 14 वाघ -वाघिणी सह 5 बिबटे आहेत. या छोट्या वन्यजीव शुश्रूषा केंद्राचा विस्तार आवश्यक आहे. वनविभागाने आता पाठपुरावा केला असून 20 नवे आधुनिक पिंजरे तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. मात्र त्याला किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. चंद्रपूर आणि नागपुरातही वन्यजीव कोंडून ठेवण्याच्या क्षमतेचा अंत झालाय. वाघांच्या वर्तनात सतत कोंडून ठेवल्याने होणारे दुष्परिणाम आणि त्वचा विकार बघता वाघांनाही सुरक्षित घर हवे आहे.
