हर घर तिरंगा, हर मन तिरंगा; तिरंगा म्हणजे भारताच्या शौर्य, त्याग आणि अखंडतेचा प्रेरणास्रोत – आ. सुधीर मुनगंटीवार

मुलमध्ये देशभक्तीच्या उत्साहात भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

रामलीला भवन ते गुजरी चौक दोन किलोमीटरच्या यात्रेत भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष; शहीदांना कृतज्ञ अभिवादन

मुल : हर घर तिरंगा, हर मन तिरंगा; तिरंगा म्हणजे भारताच्या शौर्य, त्याग आणि अखंडतेचा प्रेरणास्रोत आहे. तिरंगा हातात घेतला की आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य शहीदांचे स्मरण होते. त्यांच्या बलिदानामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य अधिक समृद्ध, सुरक्षित आणि वैभवशाली करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे,” असे प्रतिपादन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुल येथे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत ते बोलत होते. मुल येथील रामलीला भवन येथून सुरू झालेल्या या यात्रेचा गुजरी चौक येथे समारोप झाला. यावेळी आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते तिरंग्याच्या रंगांचे फुगे आकाशात सोडून देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला.

आ. मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हजारो शहीदांना कृतज्ञतापूर्वक नमन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्रसेवेची भावना मनात जागविणे आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करणे हीच स्वातंत्र्यदिनाची खरी भावना आहे. देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाने देशभरात राष्ट्रभक्तीची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंग्याविषयी अभिमान ही भावना अधिक दृढ झाली पाहिजे. तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून भारताचा स्वाभिमान, एकता, अखंडता, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे तिरंग्याचा सन्मान करणे म्हणजे देशाच्या अस्मितेचा सन्मान करणे होय, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

जेव्हा आपण हातात तिरंगा घेतो, तेव्हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे स्मरण होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या जाज्वल्य नेतृत्वातून देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची तीव्र आस निर्माण केली. या सर्व स्वातंत्र्यवीरांचे योगदान भारतीय राष्ट्रजीवनासाठी सदैव प्रेरणादायी राहील.शहीद-ए-आझम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतिवीर मंगल पांडे, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, भगवान बिरसा मुंडा आणि असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनंत यातना सहन केल्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने श्वास घेत आहोत.

शहीद राजगुरू यांच्या स्मृती जपण्यासाठी राजगुरूनगर येथे स्मारक उभारण्याचा संकल्प करण्याचे सौभाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक क्रांतिवीराच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.‘वंदे मातरम्’ हा केवळ एक जयघोष नाही, तर तो भारतमातेप्रती असलेल्या आपल्या श्रद्धेचा आणि राष्ट्रभक्तीचा मंत्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतिकारकांच्या ओठांवरून उमटलेला ‘वंदे मातरम्’चा जयघोष आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागवतो. त्यामुळे ‘वंदे मातरम्’चा जयघोष करताना आपल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञ भावना आपल्या मनात असली पाहिजे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेले जालियनवाला बाग हत्याकांड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत वेदनादायी पर्व आहे. जनरल डायरच्या आदेशाने निरपराध नागरिकांवर अमानुष गोळीबार करण्यात आला. असंख्य भारतीयांनी या हत्याकांडात प्राण गमावले. अशा असंख्य शहीदांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानातून आजचा स्वतंत्र भारत घडला आहे. त्यांच्या स्मृती आपल्याला देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील.

मुल येथे आयोजित करण्यात आलेली ही दोन किलोमीटरची तिरंगा यात्रा म्हणजे राष्ट्रभक्तीचा उत्स्फूर्त जागर ठरली. रामलीला भवन येथून सुरू झालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभक्त सहभागी झाले. हातात तिरंगा आणि हृदयात भारतमातेविषयी अभिमानाची भावना घेऊन नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभाग नोंदविला. संपूर्ण मार्गावर तिरंग्याचा जयघोष आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.

ही तिरंगा यात्रा केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणारी ठरावी. देशाने आपल्याला जे दिले आहे, त्याची परतफेड राष्ट्राच्या विकासात आपले योगदान देऊन करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. भारताला अधिक सामर्थ्यवान, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ही भव्य तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजक तसेच मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या देशभक्त नागरिकांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *