परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा; जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश

चंद्रपूर दि. 17 : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभिर्याने दखल घेऊन सर्व जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 17) यंत्रणांचा आढावा घेऊन आपापल्या परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या गावात, तालुक्यात आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, व्हीजेएनटीच्या शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा आहेत, तेथे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींनी नियमित भेट देऊन अधिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संपर्कात राहावे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफचे मोबाईल क्रमांक आश्रमशाळेतील कर्मचा-यांजवळ असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महसूल यंत्रणेच्या अधिकारी – कर्मचा-यांचेही मोबाईल क्रमांक आश्रमशाळेत देऊन ठेवावे.

आश्रमशाळेच्या परिसरातील वाढलेले गवत, झुडपे नियमितपणे काढावे. जेणेकरून साप, विंचू आदींपासून कोणताही धोका राहणार नाही. झाडे, झुडपे असलेल्या भागात तसेच संरक्षण भिंतीलगत थिमेटचा वापर करावा. त्याची दिनांकनिहाय नोंद ठेवावी. वर्गखोल्या आणि विद्यार्थी असेलेल्या खोल्यांच्या दरवाजाखाली रबर स्टिक लावून घ्यावी. परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *