चंद्रपूरच्या अविनाश पोईनकर यांचा ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रह पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

एम.ए. मराठी विषयात समावेश ; वैदर्भीय साहित्याची विद्येच्या माहेरघरात दखल

चंद्रपूर :आदिवासी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले युवा कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक आणि कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ या कवितासंग्रहाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या एम.ए. मराठी प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात संपूर्ण ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. दंडकारण्य-अबुजमाड परिसरातील आदिवासी जीवन, जल-जंगल-जमिनीचा संघर्ष आणि पर्यावरणीय प्रश्न कवितेच्या माध्यमातून मांडणाऱ्या या संग्रहाचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश होणे ही वैदर्भीय साहित्यविश्वासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.

मुंबईच्या लोकवाङ्मय गृह प्रकाशनाने २०२५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘दंडकारुण्य’मध्ये गडचिरोली, बस्तर आणि अबुजमाड परिसरात कार्यकर्ता म्हणून पोईनकर यांनी अनुभवलेल्या आदिवासी जीवनाचे, जल-जंगल-जमिनीच्या संघर्षाचे तसेच पर्यावरण आणि विस्थापनाच्या प्रश्नांचे कवितेच्या माध्यमातून चित्रण केले आहे. प्रत्यक्ष सामाजिक कार्यातून आलेले अनुभव आणि आदिवासी समाजाच्या जगण्यातील अंतर्विरोध या कवितांमधून व्यक्त झाले आहेत.

कोरपना तालुक्यातील बिबी या छोट्याशा गावातील अभावग्रस्त कुटुंबातून आलेल्या अविनाश पोईनकर यांचा हा साहित्यिक प्रवास आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही शैक्षणिक अथवा साहित्यिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी सामाजिक कार्यासोबत साहित्यलेखनाची वाट धरली. ‘दंडकारुण्य’ हा त्यांचा कवितासंग्रह मराठी साहित्यात विशेष दखलपात्र ठरला आहे. या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचा ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार तसेच प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज, पुणे यांचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

•••

‘दंडकारुण्य’चा बंगाली, इंग्रजी अनुवाद

‘दंडकारुण्य’ या कवितासंग्रहाचे बंगाली आणि इंग्रजी भाषेत अनुवादाचे कामही पूर्ण झाले आहे. कोलकाता येथील लेखक, अनुवादक पंकज चॅटर्जी व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा. मृण्मय प्रमाणिक यांनी बंगाली व इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. दोन्ही भाषांतील अनुवाद लवकरच प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे ‘दंडकारुण्य’मधील आदिवासी जीवन आणि संघर्षाचे विश्व महाराष्ट्राबाहेरील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.

••••

संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातही कवितेचा समावेश

छत्रपती संभाजीनगर येथील स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त देवगिरी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातही अविनाश पोईनकर यांच्या कवितेची निवड झाली आहे. बी.ए. प्रथम वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या अभ्यासक्रमात ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहातील ‘मातृसत्तेच्या हातात’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण कवीच्या कवितेचा विद्यापीठीय पातळीवरील अभ्यास होणे अभिमानास्पद बाब ठरली आहे.

प्रतिक्रिया ;

लेखनाला आत्मबळ मिळाले

आदिवासी आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष अनुभवलेल्या नोंदींचा हा कवितासंग्रह आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न तसेच दंडकारण्यातील पर्यावरणीय जाणीवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे आनंददायी आहे. या निमित्ताने लेखनाला आत्मबळ मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे आभार

– अविनाश पोईनकर
(कवी, चंद्रपूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *