तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा घालून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एका आरोपीला अटक तर मुख्य सूत्रधाराचा गडचिरोली पर्यंत केला जात आहे तपास
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या मौजा रयतवारी या गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्नसुरक्षा विभागाने संयुक्तकारवाई करत एका तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा घालून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गावातील विजय भांडेकर नामक इसमाकडे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू ,हुक्का तंबाखू यांचा साठा असून तो गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून धाड घालण्यात आली. यात साडेअकरा लाख रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाडीदरम्यान हुक्का तंबाखू ,खुला सुगंधित तंबाखू ,पॅकिंग साहित्य, यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. या साठ्याचा व विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून गडचिरोलीचा विनय गुप्ता याचे नाव पुढे आले असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
