मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग

या प्रकरणी प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई,दि.२७ – मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून ९ निष्पाप कर्मचाऱ्यांचा जीव गेला. ही एक दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
या संदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मोशी कचरा डेपोमध्ये सुमारे ६५ ते ७० फूट उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर तीन मजली प्रशासकीय इमारतीला बांधकाम परवानगी कशी देण्यात आली, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार लँडफिल परिसरात आवश्यक बफर झोन राखणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार धोकादायक परिसरात बांधकाम परवानगी देणे आणि वापर परवाना मंजूर करणे कायद्याच्या विरोधात असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतही गंभीर अनियमितता झाल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना, बांधकाम परवानगी विभागातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी नगरविकास विभागाकडे केली.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार मोशी डेपो व वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाचे तातडीने सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. कामगार आणि नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कचऱ्याचे ढिगारे शास्त्रोक्त पद्धतीने कमी करून आवश्यक बफर झोनची पुनर्स्थापना करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *