आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या विकास प्रश्नांवर मुंबईत उच्चस्तरीय बैठक

शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या, बल्लारपूर ESIC रुग्णालय, उद्योगांसाठी जमीन आणि विदर्भ वीज प्रोत्साहन योजनेवर राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णयात्मक चर्चा

जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी संवेदनशील पाठपुरावा करणारे आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना शासनाची सकारात्मक दखल

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी निगडित प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी आणि शेतकरी, उद्योग, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे विषय तातडीने मार्गी लागावेत, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत राज्य शासनाने मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता एमएसआरडीसी कार्यालय, सातवा मजला, निर्मल भवन, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आदी विभागांच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडण्या, बल्लारपूर येथील ESIC रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून देणे, महिला औद्योगिक वसाहत तसेच विदर्भ स्वतंत्र वीज प्रोत्साहन योजनेसह विविध महत्त्वाच्या विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.

मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता एमएसआरडीसी कार्यालय, सातवा मजला, निर्मल भवन, मुंबई येथे होणाऱ्या या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार त्वरित वीज जोडण्या देण्याचा विषय, बल्लारपूर येथे ESIC रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल आणि महिला औद्योगिक वसाहतीसाठी बंद असलेल्या पॉवर हाऊसमधील ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तसेच विदर्भासाठी स्वतंत्र वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

या बैठकीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), ESIC, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, विविध विषयांवर आवश्यक निर्णय घेण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीला गती देण्यासाठी सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करत आहेत. शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडण्या मिळाव्यात, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बल्लारपूर परिसरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या राहाव्यात तसेच विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बळ मिळावे, यासाठी त्यांनी मंत्रालयीन स्तरावर तसेच विधानसभेत सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या या विकासाभिमुख आणि संवेदनशील भूमिकेमुळेच चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय आता निर्णयप्रक्रियेच्या टप्प्यावर आले आहेत.

चंद्रपूरच्या विकासाला नवी गती देणारे निर्णय वेळेत व्हावेत, शेतकरी, उद्योग, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावेत, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने शासनस्तरावर पुढाकार घेत आहेत. जनहिताच्या प्रत्येक विषयाचा सखोल पाठपुरावा करून संबंधित विभागांमध्ये समन्वय साधत ठोस निर्णय घडवून आणण्यावर त्यांचा भर असून, त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून २८ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली ही उच्चस्तरीय बैठक चंद्रपूरच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *