हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

दिल्लीतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा सिंदेवाहीत तीव्र निषेध

सरकारवर आ. वडेट्टीवार यांची सडकून टीका

दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत त्यांनी, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठणारे निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणारे सरकार लोकशाहीच्या मूल्यांवर घाला घालत आहे,” असा घणाघाती आरोप केला.

पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे हे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला असून, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर न्याय, हक्क आणि विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलकांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारालाच आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, पिकांना न मिळणारा हमीभाव, वाढती उत्पादनखर्चाची समस्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील विलंब आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांची दुरवस्था याकडे लक्ष वेधले. “सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी भविष्याबाबत चिंतेत आहे, तर बेरोजगार युवक रोजगारासाठी भटकत आहे. मात्र सरकारला या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीची अधिक चिंता आहे,” असा आरोप त्यांनी केला.
आ. वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्यात यावेत. अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर जनआंदोलन उभारून सरकारला जनतेच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *