हैद्राबाद गॅझेट आधार मुद्द्यावर भडकले ओबीसी
चंद्रपुरात ओबीसी विरोधी नव्या शासन जीआर ची ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होळी
मराठा समाजाला ओबीसी घटकांच्या आरक्षणाचा लाभ देण्यास ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला आहे. राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारावर राज्यातील मराठा समाजाला नोंदी पाहून ओबीसी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी समाज भडकला आहे. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शहरातील गांधी चौकात नव्या जीआरची होळी केली.
महाराष्ट्र शासनाने हा जीआर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. चंद्रपुरातच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे वास्तव्य आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास हंसराज अहिर यांना जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही असा इशारा ओबीसी कार्यकर्त्यांनी दिलाय. हंसराज अहिर यांनीच आता राज्य सरकारला हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
