राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री असताना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील २२ गावांमध्ये अत्याधुनिक सार्वजनिक वाचनालये व स्मार्ट अभ्यासिका उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला होता. सुधीरभाऊंच्या विशेष पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठी २९ कोटी ८४ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. या वाचनालयांमध्ये डिजिटल संगणक कक्ष, प्रशस्त अभ्यासिका, वृत्तपत्र विभाग, सोलर सुविधा, एअर कंडिशनर, आधुनिक फर्निचर आदी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या उपक्रमाचा केंद्रबिंदू असलेला प्रकल्प मुल तालुक्यातील मारोडा येथे साकारत असून, जिल्ह्यातील इतर २१ गावांमध्येही काम प्रगतीपथावर आहे. ही केवळ वाचनालयांची उभारणी नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत चंद्रपूरमध्ये ज्ञानाधिष्ठित, सक्षम आणि स्पर्धात्मक पिढी घडविण्याच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचे हे प्रभावी पाऊल ठरत आहे.
