अल्पवयीन मुलीच्या नवजात बालक विक्री प्रकरणाचा सर्वंकष तपास करा; मानवी तस्करीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून कोणालाही राजकीय संरक्षण देऊ नका – शेकडो महिलांसह शिवसेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

चंद्रपूर : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बालक विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. मनीषाताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमती शारदा मनोहर पाचभाई यांनी शहरातील शेकडो शिवसैनिक महिलांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष, निष्पक्ष व पारदर्शक तपास करण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, या प्रकरणाचा तपास केवळ नवजात बालक विक्रीपुरता मर्यादित न ठेवता त्यामागे मानवी तस्करी (Human Trafficking), अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, संघटित सेक्स रॅकेट किंवा नवजात बालक विक्रीचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही सखोल तपास करण्यात यावा. शिवसेनेने २९ जून रोजीच वाढत्या अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांबाबत प्रशासनाला पूर्वसूचना दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच वर्षभरातील २०० हून अधिक बेपत्ता अल्पवयीनांच्या प्रकरणांचा फेरतपास, शहरातील हॉटेल्स, लॉज व संशयित ठिकाणांची विशेष तपासणी, संवेदनशील भागात वाढीव पोलीस गस्त आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यासह कोणत्याही आरोपीला कोणतेही राजकीय संरक्षण न देता संपूर्ण तपास निष्पक्ष, पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी मेघा अक्केवार, सीमा मेश्राम, मनीषा यामावार, मंगला कन्नमवार, सपना माडुरवार, माधवी मेंढे, सोनाला अक्केवार, माला दिकोडवार, पुनम अक्केवार, श्रीदेवी बावणे, रोहिणी काईबाई, सोनाली देरकर, उषा लामसे, सुमन फुसाटे यांच्यासह शेकडो शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.

यावेळी गोमती शारदा मनोहर पाचभाई म्हणाल्या, “अल्पवयीन मुली आणि नवजात बालकांच्या विक्रीसारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला, त्याची राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी काहीही असली तरी कोणतेही राजकीय संरक्षण मिळता कामा नये. या प्रकरणामागे नेमका सूत्रधार कोण आहे, संपूर्ण रॅकेटचा आकार किती मोठा आहे, कोणाचे आर्थिक किंवा इतर हितसंबंध त्यामागे आहेत, याचाही कसून तपास करून प्रत्येक दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महिला व बालकांच्या सुरक्षेशी संबंधित अशा गुन्ह्यांबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *