चंद्रपूर शहराच्या स्थापित इतिहासातील महत्वाचे धार्मिक केंद्र आहे पठाणपुरा विठ्ठल मंदिर
चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांनी जनसेवेच्या कामाचा प्रारंभ विठ्ठल मंदिराच्या मुद्द्यावरून केलात. आपल्या स्वतःच्या प्रभागातील 400 वर्ष जुन्या मंदिराला ब दर्जा देण्याच्या मागणीसाठी मार्गदर्शक नेते आ. मुनगंटीवार यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पठाणपुरा विठ्ठल मंदिर चंद्रपूर शहराच्या स्थापित इतिहासातील महत्वाचे धार्मिक केंद्र आहे.
मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन सदर कामे अधिक सक्षमपणे करता येणार आहे. श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाला शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव आ. मुनगंटीवार यांच्या विनंती नुसार पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
