इरई धरणावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 25 : मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देणे, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणे, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने इरई धरणावर बुधवारी विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच पूर परिस्थिती व एलनिनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागांना दिल्या.
यावेळी प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (सीपीआर), पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी, इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, सीपीआर व विविध प्रकारच्या बँडेज कशा प्रकारे बांधतात अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसेच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणीसुध्दा करण्यात आली .
प्रशिक्षणस्थळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासोबत तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार राजू धांडे व ओंकार ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर चे पोलिस निरीक्षक श्री दाते यांच्या नेतृत्वात 10 रेस्क्यूवर आधारीत सदर प्रशिक्षण पार पडले.
०००००००
