मोहरमच्या दिवशी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला जिल्हा तुरुंग नागरिकांसाठी खुला केला जातो. सर्वधर्मीय भाविक या तुरुंग परिसरात असलेल्या गैबीशाह वली दर्ग्यावर नतमस्तक होतात. सुमारे ४०० वर्ष जुन्या या दर्ग्यातील विहिरीचे पाणी तीर्थरुपात प्राशन करण्यासाठी तुरुंग परिसरातील गर्दी होते.
चंद्रपूरचे हे कारागृह या भागातील लढवय्ये शासक ‘ गोंडराजे ‘ यांचा राजवाडा आहे. इंग्रजांनी या राजवाड्याचे कारागृहात रूपांतर केले होते. याच कारागृह परिसरात आहे गैबीशाह वली या संत पुरुषाचा ४०० वर्ष जुना दर्गा. इंग्रजांच्या काळातही इथल्या वार्षिक उरुसात खंड पडला नाही. वर्षात एकदा या कारागृहातील या दर्ग्यावर मोहरम च्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी होते. दरवर्षी भाविक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून हा उत्सव शांततेत पार पडतो.
या दर्गा परिसरात असलेल्या विहिरीतील पाणी पवित्र समजले जाते. हे पाणी प्राशन केल्याने आजार बरे होतात व दर्ग्याचे दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा समज आहे. भाविकांचा उत्साह, गजबजलेली दुकाने व चोख सुरक्षा व्यवस्थेत यंदाही हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
