मुंबई, दि. २ विशेष प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. कर्जमाफीच्या उड्या खाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची वार्ता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत लगेच घोषणा होणार नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभागाकडून अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे. या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यामुळे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ५६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, मात्र सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही.
दोन लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन निधी
दोन लाख रुपयांच्या मर्यादित अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देखील दिला जाणार आहे.

