जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, पोलिस निरीक्षक अमोल काचारे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पिडीतांना दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच कागदपत्रांची पुर्तता जलदगतीने करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. पिडीतांना देय असलेल्या लाभाचा पहिला हप्ता त्वरीत देण्याचे नियोजन करावे.

सादरीकरण करतांना सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत्‍ एप्रिल 2025 ते मार्च 2026 अखेरपर्यंत घडलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. तसेच पोलिस तपासातील गुन्हे, पोलिस फायनल गुन्हे, न्यायालयात दाखल गुन्हे आदींची माहिती बैठकीत दिली. तसेच गत वर्षातील 20 पिडीतांना पहिला हप्ता तर 29 पिडीतांना दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण 49 पिडीतांना 41 लक्ष 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *