ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई, दि. १२ प्रतिनिधी :प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने”, “ये मेरा दिल” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. विशेषतः आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली.

आशा भोसले यांचा आवाज म्हणजे केवळ गाणे नव्हते तर प्रत्येक भावनेला जिवंत करणारी जादू होती. त्यांच्या कारकिर्दीसाठी पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वडिलांच्या निधनानंतर अगदी लहान वयातच आशा भोसले यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांचे पहिले मराठी गाणे “चला चला नव बाळा” (१९४३) तर हिंदीतील सुरुवातीच्या गाण्यांमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली.

आशाताईंनी केवळ फिल्मी गाणीच नाही तर गझल, भजन, कव्वाली, पॉप, मराठी भावगीते, बंगाली आणि इतर प्रादेशिक गाणी गायली आहेत. आशाताईंच्या आवाजात रोमान्स, विरह, खट्याळपणा आणि गझलेची नजाकत एकाच वेळी अनुभवायला मिळत होती. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वाचा एक अमर ठेवा आहे. गेल्या ८ दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादूई आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सूर आज कायमचा शांत झाला आहे.

आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी ही माहिती दिली की, त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. आशा भोसले यांचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचे निधन झाले. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत लोअर परेल या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.

आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचे असणे हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होते. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणे ही त्यांची खासियत होती. त्यांचे कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे नसणे हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणार आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *