चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तळोधी-बाळापूर शेतशिवारात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे. वनविभागाने या वाघाला जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तळोधीजवळच असलेल्या सावर्ला परिसरात सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या प्रमिला अरूण वाटगुरे (४५) या महिलेला वाघाने ठार केले होते. या घटनेनंतर तळोधी भागात दहशत निर्माण झाली होती. या वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी रेटून धरली गेली. अखेर वनविभागाने ही सफल मोहीम राबविली.
