चंद्रपूरच्या डॉक्टर वैदेही लोया हिने पटकावले सुवर्णपदक , एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्राविण्यासह MBBS उत्तीर्ण

15 एप्रिल रोजी नागपुरात राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार सन्मानित, वडील जुगल लोया यांचे नागपूर महामार्गावर पडोली येथे आहे छोटे चहाचे दुकान

चंद्रपुरात छोटी चहा टपरी असलेल्या वडिलांची कन्या डॉ. वैदेही लोया हिने सुवर्णपदक पटकावले आहे. तिने एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्राविण्यासह MBBS उत्तीर्ण केले आहे. जनरल मेडिसिन विषयात तिला डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक मिळाले आहे. 15 एप्रिल रोजी नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होत असलेल्या एम्सच्या दुसऱ्या दीक्षांत सोहळ्यात वैदेहीला राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

वैदेही हिचे वडील जुगल लोया यांचे नागपूर महामार्गावर पडोली येथे छोटे चहाचे दुकान आहे. त्यांचा 2 मुली आणि पत्नी असा परिवार याच आधारे प्रगती करत आहे. वैदेही सध्या एम्स नागपूर येथे एमडी च्या प्रथम वर्षाला आहे. शैक्षणिक वाटचालीत वैदेहीने सतत गुणवत्ता दाखविली आहे. चंद्रपूरच्या विद्या निकेतन शाळेतून दहावी, बारावीत उल्लेखनीय यशानंतर नीट परीक्षेतही तिने 4 जिल्ह्यात प्रथम स्थान मिळविले होते. MBBS मध्ये सुवर्णपदक जाहीर झाल्यावर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *