चंद्रपूर विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा संपन्न, जग्गन्नाथ पुरी प्रमाणे हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची प्रथा

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेली चिमुरची घोडा यात्रा काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली. चिमुरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री बारा नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जग्गन्नाथ पुरी प्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे.

मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं व त्यानंतर तिची पहाटे पर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती. जवळ-जवळ तीनशे वर्षांपासून सुरु असलेल्या या घोडायात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडे तीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हा पासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली.

या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोकं चिमूर मध्ये दाखल होतात. तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुध्दा या काळात चिमूर मध्ये लोकांची मोठी गर्दी होते. १९४२ ला इंग्रजांविरुध्द झालेल्या चिमूर क्रांती मध्ये सुध्दा या बालाजी मंदिराची भूमिका महत्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुध्दा लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *