कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड साठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर खाणकाम उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज- मोकासा या गावी ही कोळसा खाण आहे. या खाणीतून निघालेला कोळसा कर्नाटक राज्यात ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. मात्र कंपनीला अधिग्रहित न झालेली बरांज -मोकासा गावातील 84.41 हेक्टर वन जमीन बेकायदेशीररित्या खोदून काढण्याची रीतसर तक्रार राज्याचे लोकायुक्त आणि पुनर्वसन सचिव तुकाराम मुंडे यांना पाठविण्यात आली आहे.
या जागेतून सुमारे 80 लाख मेट्रिक टन कोळसा काढून परस्पर विकण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि वन विभागाचे स्वतंत्र आणि स्वयं स्पष्ट अहवाल देखील आहेत. तक्रारीत कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व कोळसा उत्खनन कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याने या भागातील गावांचे पुनर्वसन न करता कोळसा उत्खनन केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय.
