चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर हे आंदोलन करण्यात येत असून त्यांच्या सोबत जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक देखील मोठ्या संख्येत सामील झाले आहेत. ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमण मार्ग उध्वस्त करून मानव- वन्यजीव संघर्ष आणखी वाढविण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ज्या ब्रम्हपुरी भागात लोहारडोंगरी लोहखाण प्रस्तावित आहे, त्याच भागात कमी अधिक प्रमाणात दीडशे वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्याने नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट स्थिती उद्भवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबा च्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलाना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव -वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत
