चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. खाजगी इसमाच्या माध्यमातून 1 लाख 30 हजारांची लाच घेतल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. शुभम वरघट असे या आरोपी अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराने आपल्या घर बांधकाम विस्तार मंजूरीसाठी प्रकरण दाखल केले होते. यासाठी अभियंत्याने एकूण 2 लाख 30 हजारांची लाचेची मागणी केली होती.
यातील 1 लाख रु. ची रक्कम त्याने मध्यस्थ दिनेश समुंद याच्या माध्यमातून आधीच स्वीकारली होती. उर्वरित रकमेसाठी त्याने तगादा लावला होता.एसीबीने शहरातील वर्दळीच्या भागात मध्यस्थाने शिल्लक रक्कम स्वीकारताना सापळा रचून कारवाई केली. चंद्रपूर मनपात नवे कारभारी पदारूढ झाल्यावर लाचखोरीचे हे प्रकरण उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
