चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्या, दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक स्वतंत्रपणे अज्ञात स्थळी रवाना

चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी आता काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्या बघायला मिळत आहेत. दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे सुमारे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले असून पक्षांतर्गत विरोधी खा. प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या समर्थक सुमारे 12 नगरसेवकांसाठ एकत्रित वेगळी व्यवस्था केली आहे.

2 दिवसात महापौर पदासाठी जाहीर आरक्षण जाहीर होण्याची शक्यता असून महापौर आणि इतर सर्व पदांवर आपल्याच गटाचा नगरसेवक व्हावा यासाठी दोन्ही गट शड्डू ठोकून उभे आहेत. एकूण 66 नगरसेवकांच्या या महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर 27 जागा जिंकल्या आहेत. तर निवडणूकपूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस एकत्रितपणे 30 जागांसह सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. तर 6 जागा मिळालेल्या उबाठा शिवसेनेशी काँग्रेसच्या वाटाघाटी सुरू आहेत.

याशिवाय वंचित 2, अपक्ष 2, बसपा 2 आणि एमआयएम 1 ,या पक्षांशीही काँग्रेस बातचीत करत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना स्वबळावर 34 हा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजप सध्या शिंदे सेनेच्या एका सदस्यासह एकूण 24 जागा मिळवत वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *