चंद्रपूर:चंद्रपूर महानगरपालिकेत आपल्या समर्थकांना जास्तीत जास्त तिकीट मिळवून देण्यासाठी भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात रंगलेला वाद काल सर्वांनीच पाहिला. मात्र त्यातही आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठी शक्कल लढवत आपल्या एका समर्थकाच्या पत्नीला अगदी शेवटच्या क्षणी तिकीट मिळवून दिले. हे नाव आहे भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राशीद हुसेन यांची पत्नी ईस्मत हुसेन यांचे.
भाजपसाठी अतिशय अवघड असलेल्या प्रभाग क्रमांक 10 म्हणजे एकोरी प्रभागातून ईस्मत हुसेन या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. सुरुवातीला भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीबाबतच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटेल अशी चर्चा झाल्याने ईस्मत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीसोबतची भाजपची युती तुटली आणि शिवसेने सोबत युतीचा निर्णय अंतिम झाला. मात्र त्यातही जोरगेवार यांनी शेवटच्या क्षणी आपल्या समर्थकाच्या पत्नीला शिवसेनेतून तिकीट मिळवून दिली आणि त्या एकोरी प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार ठरल्या.
