औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक विकासाला चालना दिल्याबद्दल लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक सन्मानित
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि सामुदायिक विकासाच्या माध्यमातून परिसरात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बी. प्रभाकरन यांनी हा सन्मान गडचिरोलीच्या जनतेला समर्पित करून विकासाच्या प्रवासात मिळालेल्या विश्वास आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्याज फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अभिनेता शाहरुख खान, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार तसेच मनोरंजन, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बी. प्रभाकरन म्हणाले की, गडचिरोलीत शाश्वत विकासाला चालना देणारा, स्थानिक समुदायांच्या आकांक्षांशी जोडलेला आणि पर्यावरणाप्रती संवेदनशील असलेला औद्योगिक विकास घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. औद्योगिक विकासाचा लाभ केवळ कारखान्यांपुरता मर्यादित न राहता स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात, तसेच कुटुंबांना उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि उपजीविकेची साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. स्थानिक जनतेच्या सहभाग आणि विश्वासाशिवाय ही प्रगती शक्य नाही. त्यामुळे हा पुरस्कार गडचिरोलीच्या जनतेचा असून, त्यांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आई-वडील आणि भाऊ कार्तिकेयन यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच बबलूलाल अग्रवाल, मुकेश गुप्ता आणि राजेश गुप्ता यांनी त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन लॉयड्स परिवाराचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व्यावसायिक प्रगतीसोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सने आतापर्यंत १७ हजार ५०० हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये सुमारे १४ हजार ५०० पुरुष आणि ३ हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीने २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले आहे.
बोदली येथील लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) अकादमीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. औद्योगिक कौशल्य, वाहनचालक प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, डिजिटल कौशल्य आणि खाण सुरक्षा अशा विविध क्षेत्रांत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थींनी येथे प्रशिक्षण घेतले असून, त्यांना १०० टक्के रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये ४०० महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश असून, ३० हून अधिक ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून कंपनी आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका विकासाच्या क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कंपनीच्या आरोग्यविषयक सेवांचा आतापर्यंत २ लाख ७६ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. याअंतर्गत २५ हून अधिक मोबाईल आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ४९७ हून अधिक संस्थात्मक प्रसूतींसाठी मदत करण्यात आली आहे. लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयात स्थानिक नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण सेवा, शस्त्रक्रिया आणि मातृत्व आरोग्य सेवांसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
शिक्षण क्षेत्रात लॉयड्स राज विद्या निकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह निवासी सुविधाही पुरविल्या जात आहेत. कंपनीच्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत एकूण २ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी २ हजार १०० हून अधिक विद्यार्थी निवासी आहेत. एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ४५.७ टक्के आहे. याशिवाय ३० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात संपूर्ण प्रायोजित उच्च शिक्षण घेण्यासाठी कंपनीने मदत केली आहे.
शेती क्षेत्रातही कंपनीने ३५० हून अधिक शेतकऱ्यांना सहकार्य केले असून, लाभार्थी कुटुंबांच्या कौटुंबिक उत्पन्नात ११० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आत्मसमर्पण केलेल्या ९६ हून अधिक नक्षलवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचे पुनर्वसन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्समावेश करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. वान्या गारमेंट सेंटरच्या माध्यमातून परिसरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक विकासासोबतच स्थानिक जनतेला उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लॉयड्स मेटल्सकडून केला जात आहे. गडचिरोलीचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
