नक्षलग्रस्त भागातून जागतिक कौशल्य केंद्राकडे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत लॉयड्सच्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमीचे उद्घाटन

प्रदेशात ₹20,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या बळावर लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) ने आतापर्यंत 2,500 हून अधिक स्थानिक युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियापासून पापुआ न्यू गिनीपर्यंत आदिवासी तरुणांच्या कौशल्यांना जागतिक संधींशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.

गडचिरोली, महाराष्ट्र | 15 नोव्हेंबर 2026 — गडचिरोलीच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनातील एक ऐतिहासिक टप्पा ठरत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बोदली येथे लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) चे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) च्या प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या LMGSE चे उद्दिष्ट स्थानिक युवकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून घडविणे हे आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री श्री. जुएल ओराम, खासदार श्री. नामदेव किरसान, पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीमती तुलसी मुंडा, आमदार श्री. धर्मराव बाबा आत्राम आणि डॉ. मिलिंद नारोटे, पोलीस अधीक्षक एम. रमेश, श्री. अरविंद सावकार पोरड्डीवार, श्री. हर्षवर्धन आत्राम, LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन आणि LFFG च्या अध्यक्षा श्रीमती अलका मिश्रा यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी LMGSE मध्ये विविध ट्रेड्समध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 2,500 हून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

शांतता आणि शाश्वत समृद्धीचा नवा अध्याय

अकादमीच्या परिसराला भेट देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी येथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. हा संस्थान कोणत्याही जागतिक दर्जाच्या संस्थेपेक्षा कमी नसल्याचे नमूद करत, येथे दिले जाणारे प्रशिक्षण गडचिरोलीतील युवकांना जगात कुठेही रोजगार मिळविण्यास सक्षम बनवेल, असे त्यांनी सांगितले.

एकेकाळी नक्षलवादाच्या तीव्र प्रभावाखाली असलेल्या भागात औद्योगिक विकास आणण्यासाठी धाडस आणि कटिबद्धता दाखवल्याबद्दल त्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांचे विशेष कौतुक केले. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची स्वप्ने आणि भविष्यातील ध्येय जाणून घेतल्यानंतर ते अत्यंत प्रभावित झाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “लॉयड्स कंपनीचा विश्वास आहे की, नफा हा सामुदायिक विकासाचा परिणाम असतो. श्री. प्रभाकरन यांनी येथे खाणकाम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा मी स्थानिक युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, असा आग्रह धरला होता. प्रचंड आव्हानांवर मात करून त्यांनी केवळ स्थानिकांचा विकास घडवून आणला नाही, तर हिंसेचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठीही योगदान दिले.”

सुरजागड येथील LMEL च्या शाश्वत खाणकाम पद्धतींचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्याची तुलना निसर्गाचे शोषण करण्याऐवजी गायीचे दूध काढण्याच्या प्रक्रियेशी केली. लॉयड्स स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना खाणकामाचे शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पाच स्थानिक महिलांना पापुआ न्यू गिनी येथे पाठविण्यात येत असून, त्या तेथील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देणार आहेत.

भारताच्या हरित औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले, “आपण सर्वांनी मिळून शाश्वत विकासाचा खरा अर्थ जगाला दाखवून द्यायचा आहे आणि गडचिरोलीला ‘भारताचे ग्रीन स्टील हब’ बनवायचे आहे.”

केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री श्री. जुएल ओराम यांनीही या विचारांना पाठिंबा देत लॉयड्सच्या प्रकल्पांना भविष्याचा वेध घेणारे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारे उपक्रम असे संबोधले. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी श्री. प्रभाकरन यांनी दीर्घकाळ जोपासलेल्या दूरदृष्टीचेही त्यांनी कौतुक केले.

भविष्यातील अभियंते, डॉक्टर, वैमानिक आणि उद्योजक घडविण्याचा संकल्प

उपस्थितांना संबोधित करताना LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. या प्रदेशात ₹20,000 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यामध्ये पूर्णपणे स्वदेशी दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या ₹10,000 कोटींच्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचाही समावेश आहे. आशियातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. प्रभाकरन म्हणाले, “आम्ही आतापर्यंत 4,500 लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे. याच मातीतील युवक अभियंते, डॉक्टर, व्यावसायिक आणि अगदी आमच्या लॉयड्स सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून इंडिगोचे व्यावसायिक वैमानिकदेखील बनतील. आज गडचिरोलीतील लोक पापुआ न्यू गिनी येथे केवळ कामगार म्हणून नव्हे, तर जागतिक विकासाचे भागीदार म्हणून जात आहेत.”

स्थानिक आरोग्यसेवेप्रती LMEL ची बांधिलकी अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, कंपनीच्या प्रादेशिक रुग्णालयात अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असून, तिच्या संचालनासाठी दरमहा ₹60 लाख खर्च केले जातात.

दरम्यान, याच प्रसंगी हेडरी येथील लॉयड्स वन्या या वस्त्रनिर्मिती केंद्रात कार्यरत असलेल्या पाच महिलांना पापुआ न्यू गिनी येथे जाण्यासाठी बोर्डिंग पास सुपूर्द करण्यात आले. या महिला बोगनविल येथील महिलांना शिवणकाम आणि वस्त्रनिर्मितीचे प्रशिक्षण देणार आहेत. याशिवाय, कंपनीच्या ESOP (Employee Stock Ownership Plan) योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनाही लॉयड्सचे समभाग प्रदान करण्यात आले.

उद्योगाच्या गरजांनुरूप उत्कृष्ट प्रशिक्षण आणि जागतिक भागीदारी

बोदली येथे स्थित असलेल्या LMGSE मध्ये 1,000 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निवासासाठी निवासी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे. वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार यांच्यातील दरी भरून काढण्याचे काम ही संस्था करत आहे.

11 डिसेंबर 2025 रोजी सॉफ्ट लॉन्च झाल्यापासून या अकादमीने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत:

* 2,500 हून अधिक रोजगार संधी: 2,500 पेक्षा अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार मिळविला आहे.
* प्रशिक्षण पूर्ण होताच रोजगार: अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना त्याच दिवशी अप्रेंटिसशिप नियुक्तीपत्रे दिली जातात.
* शिकता शिकता कमवा: प्रशिक्षणाच्या संपूर्ण कालावधीत सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना आर्थिक विद्यावेतन दिले जाते. याशिवाय भोजन, निवास आणि प्रशिक्षणाचा खर्च पूर्णपणे मोफत असतो.

प्रमुख प्रशिक्षण क्षेत्रे

विशेषीकृत सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoEs) च्या माध्यमातून LMGSE खालील क्षेत्रांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण देते:

* औद्योगिक आणि तांत्रिक कौशल्ये: वेल्डिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि विशेष माइनिंग मेट प्रशिक्षण कार्यक्रम. ऑनलाइन प्रमाणपत्र परीक्षांसाठी परिसरात स्वतंत्र संगणक केंद्राची सुविधाही उपलब्ध आहे.
* लॉजिस्टिक्स आणि ड्रायव्हिंग: प्रगत वेअरहाऊस व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी संचालन.
* हॉस्पिटॅलिटी: अन्न व पेय सेवा, हाऊसकीपिंग आणि आधुनिक रिटेल व्यवस्थापन.
* खाणकाम: माइनिंग मेट प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात.

जागतिक स्तरावरील आपले स्थान अधिक बळकट करत LMGSE ने खाणकामाच्या उपकरणांच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी FLSmidth सोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीअंतर्गत FLSmidth भारतातील आपली पहिली वर्कशॉप थेट LMGSE च्या परिसरात स्थापन करणार आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या खाणकाम तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

सर्वांगीण सामुदायिक सक्षमीकरण

तांत्रिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन LMEL गडचिरोलीमध्ये तळागाळातील सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश आहे:

* लॉयड्स सक्षम: उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि विशेषीकृत करिअरच्या संधींना प्रोत्साहन.
* ‘सखी’ कार्यक्रम: स्थानिक आश्रमशाळांमधील स्वयंपाकगृहांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि तेथील सामुदायिक स्वयंपाकींना आवश्यक सहकार्य.
* आर्थिक आणि इंटर्नशिप सहाय्य: स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये आर्थिक अडथळे येऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध आर्थिक मदत आणि इंटर्नशिपच्या संधी.

LMGSE च्या माध्यमातून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड समावेशक विकासाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे. प्रादेशिक दरी दूर करून गडचिरोलीतील युवकांना भारताच्या औद्योगिक भविष्याचे शिल्पकार बनविण्यासाठी हा उपक्रम सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *