चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 30 : न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीश, अधिवक्ता व कर्मचाऱ्यांना तातडीने प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांनी वैद्यकीय कक्षाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून अल्पावधीतच या कक्षाची उभारणी करण्यात आली.

या वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, लवकरच ईसीजी तसेच रक्त तपासणीची सुविधाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांनी दिली.

उद्घाटन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम टंडन यांच्यासह उपाध्यक्ष व सचिव, न्यायिक अधिकारी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता, जिल्हा सरकारी वकील, तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *