चंद्रपूर मनपातील काँग्रेसच्या तीन स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची स्थगिती दिली आहे. खा. प्रतिभा धानोरकर गटाचे नगरसेवक सुरेंद्र अडबाले व इतर नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेसच्या तीन स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला ही स्थगिती दिली. 3 जुलै रोजी चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा असून या आमसभेत सर्व गटनेत्यांना त्यांच्या संख्याबळाप्रमाणे स्वीकृत सदस्यांची नावं द्यायची आहेत. मात्र सध्या चंद्रपूर महानगरपालिकेत विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर यांच्यात गटनेते पदावरून वाद सुरू असून हा वाद सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
विजय वडेट्टीवार गटाच्या राजेश अडुर यांना नागपूर विभागीय आयुक्तांनी हटवून त्या जागी प्रतिभा धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. मात्र हायकोर्टाने सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली असून आता यावर 6 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे 3 जुलैला होणाऱ्या आमसभेत राजेश अडुर यांनी काँग्रेसच्या तीन स्वीकृत सदस्यांची नावं देऊ नये यासाठी प्रतिभा धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर आज सुनावणी करतांना हायकोर्टाने हा निर्णय दिलाय.
