‘डॉकर आणि क्लाउड डिप्लॉयमेंट’ विषयावर सुधीर कोचे यांचे तांत्रिक मार्गदर्शन
चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या वतीने Computer Society of India (CSI) Student Branch (2026-27) च्या स्थापना समारंभाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त ‘डॉकर आणि क्लाउड डिप्लॉयमेंट’ या विषयावर तांत्रिक व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले.
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आरसीईआरटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी CSI Student Branchच्या समन्वयक डॉ. माधवी साडू यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यानंतर संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन जानवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर Softronix Software Services Pvt. Ltd., नागपूरचे संस्थापक व संचालक सुधीर कोचे यांनी ‘डॉकर आणि क्लाउड डिप्लॉयमेंट’ या विषयावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड वातावरणात ॲप्लिकेशन्सची कार्यक्षम अंमलबजावणी व डिप्लॉयमेंट, तसेच आधुनिक तंत्रज्ञानातील विविध संकल्पना याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तांत्रिक क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता उद्योग क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान सातत्याने आत्मसात करावे, असे आवाहन केले. तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये विकसित केल्यास विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधींचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी बोरिकर आणि रिया शास्त्रकार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी CSI Student Branchचे विद्यार्थी अध्यक्ष विनित गलगोट यांनी आभार मानले.
या उपक्रमामुळे संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना डॉकर, क्लाउड आणि आधुनिक सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट तंत्रज्ञानाची व्यावहारिक ओळख मिळाली. CSI Student Branchच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाशी जोडणाऱ्या विविध उपक्रमांची संधी उपलब्ध होणार आहे.
