धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ₹२० हजार बोनस देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही मागणी; वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
आ.मुनगंटीवार यांचा विधानसभेपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा; प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आवश्यक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ₹२० हजार बोनस मिळावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. विधानसभेत हा प्रश्न ठामपणे मांडल्यानंतरही त्यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन धान बोनसची आग्रही मागणी केली . आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या वाढत्या भारातून दिलासा मिळावा, त्यांच्या मेहनतीला योग्य आर्थिक आधार मिळावा आणि धान उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिहेक्टरी ₹२० हजार बोनसची मागणी केली आहे. शेतकऱ्याच्या घामाचे मोल केवळ बाजारभावातून नव्हे, तर शासनाच्या आधारातूनही अधोरेखित झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.या प्रश्नाची सुरुवात विधानसभेपासून झाली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडत धान बोनसचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला. सभागृहात विषय मांडल्यानंतरही ते त्यावर थांबले नाहीत. संबंधित विभाग, शासनस्तर आणि निर्णय प्रक्रियेपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी ₹२० हजार बोनस देण्याचा निर्णय झाल्यास त्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा काही प्रमाणात भार हलका होण्यास मदत होईल, तसेच खरीप हंगामात धान उत्पादनासाठी मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. विशेषतः धान उत्पादनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे धान बोनसच्या मागणीबाबत शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला आता गती मिळणार आहे.
धान उत्पादक शेतकरी अत्यंत मेहनतीने पीक घेतो. वाढता उत्पादन खर्च आणि विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्याला शासनाचा आधार मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रतिहेक्टरी ₹२० हजार बोनसची मागणी मी विधानसभेत मांडली आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा ही मागणी मांडली. त्यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच आपली भूमिका आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.विधानसभेपासून सुरू झालेला हा पाठपुरावा आता मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचला असून, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीवर शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
