राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा

उत्कृष्ट स्वयंसेवकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव; सेवा पखवाड्यानिमित्त स्वच्छता अभियान

चंद्रपूर : सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर होते. यावेळी शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. वंदना खणके, तसेच मेरा युवा भारतचे कार्यक्रम अधिकारी संजय राऊत व एडवोकेट देवा पाचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्माणाची जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट स्वयंसेवकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानाला दाद देण्यात आली. हा सन्मान इतर स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी ठरला.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या निमित्ताने सेवा पखवाडा अंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कु. संजना कैथल यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. रुतुजा लेनगुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमंतू डंबारे, रोशन चौधरी, गौरव झाडे, आदित्य मंगरूळकर, अंकिता लिपटे, श्रुती बोरकर, रेहान खान, रोहित पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार तसेच कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान व सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या उपक्रमाबद्दल आयोजक व स्वयंसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *