चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ३५ गोवंशांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली.
नाकाबंदीच्या वेळी MH 31 CV 0817 क्रमांकाचा १० चक्का टाटा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक न थांबवता भद्रावतीच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत सब स्टेशन पॉवर ग्रिड, जुना सुमठाणा, भद्रावती येथे ट्रक ताब्यात घेतला.
ट्रकमध्ये ३१ गायी आणि ४ बैल असे एकूण ३५ गोवंश आढळून आले. या प्रकरणी चालक भुषण ओमकार तरारे आणि क्लिनर सयद जसिन सयद असलम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईत १५ लाखांचा ट्रक, ७ लाखांचे ३५ गोवंश आणि ३५ हजारांचे दोन मोबाईल, असा एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राकेशकुमार यावकराम टेकाम आणि मोसिन हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.
