महापौर संगीता खांडेकर यांची घेतली भेट; नियमानुसार सर्वसाधारण सभा घेण्याचा आग्रह
चंद्रपूर : दि. 4 ऑगस्ट 2026
काल दि. 3 ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी, काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे गटनेते राहुल विरुटकर तसेच महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी महापौर संगीता खांडेकर यांची भेट घेऊन दि. 5 ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यामध्ये स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांचा विषय समाविष्ट करण्याची मागणी केली.
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यानंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत सदस्यांचा विषय घेणे नियमानुसार आवश्यक असते. मात्र यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे महापौरांनी सर्वसाधारण सभा रद्द केली होती.
आता न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दि. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरही स्वीकृत सदस्यांचा विषय समाविष्ट करण्यात आलेला नसल्यामुळे चारही गटनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वीकृत सदस्यांचा विषय घेण्यासाठी व नियमबाह्य सर्वसाधारण सभा पुढे ढकलून नियमानुसार सभा घेण्याच्या मागणीसाठी यापूर्वीही भाजप-शिंदे सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-बसपा, शिवसेना (उबाठा)- वंचित बहुजन आघाडी, तसेच महानगर आघाडीच्या गटनेत्यांनी महापौर संगिता खांडेकर व आयुक्त अकनुरी नरेश यांना वारंवार निवेदने दिली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दि. 5 ऑगस्ट रोजी होणारी सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडावी, शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर निर्णय व्हावेत आणि महानगरपालिकेचे कामकाज नियमानुसार व्हावे, या उद्देशाने चारही गटनेत्यांनी महापौरांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. मात्र महापौरांनी याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचे गटनेत्यांनी सांगितले.
महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन नियमानुसार स्वीकृत सदस्यांचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करावा, यासाठी चारही गटनेत्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
