ही गाणी वाजविणे- त्यावर नृत्य करणे यावर पोलीस दाखल करत आहेत गुन्हे, मात्र प्रतिबंधित नक्षल संघटना व त्याचे सदस्य यांना मदत केल्याप्रकरणी या गुन्ह्यांचं आहे प्रयोजन, नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची चंद्रपुरात माहिती
पोलिसांनी चकमकीत ठार मारलेल्या नक्षल चळवळीचा सशस्त्र दलप्रमुख माडवी हिडमा याच्या गौरवार्थ गाणे वाजवल्याच्या घटना संदर्भात आधी पुणे व नंतर आता काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हिडमाच्या गौरवार्थ समाज माध्यमांवर हजारो गाणी सहजपणे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत ही गाणी प्रतिबंधित नसताना युवकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यावर बराच गदारोळ सुरू आहे.
या संदर्भात राज्यातील नक्षलविरोधी अभियानातील प्रमुख चेहरा असलेले व सध्या नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक असलेले संदीप पाटील यांनी पोलीस दल व गृह विभागाची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने 2009 साली प्रतिबंध केलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेचा हिडमा सदस्य होता. त्याच्या गौरवार्थ अथवा प्रतिबंधित संघटनेला मदत होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती गुन्हा ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे गुन्हे केवळ जनमानसात हे चुकीचे आहे हे ठसविण्यासाठी होत असल्याचे पाटील म्हणाले. समाज माध्यमामध्ये उपलब्ध असलेल्या अशा पद्धतीचे आक्षेपार्ह ५४ मजकूर आजवर गुप्तचर विभाग आणि नक्षलविरोधी सेलने हटवल्याची माहितीही त्यांनी दिली.
