प्रकाशक प्रकाश आंबी यांना सुरक्षा देण्यात यावी,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर, दि.२४ –सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रकाश आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, शासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची ऑडियो क्लिप व्हायरल होऊनही शासन गप्प का? गृहखात्याने तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
