छ. संभाजीनगर:शिर्डीचे शिवनेका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध बाबा अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात जितेंद्र शेळके यांच्या पत्नी आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यातील पत्नीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जितेंद्र शेळके यांची गाडी कंटेनरला मागून धडकली अन् हा अपघात झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती संबंधित यंत्रणेला मिळाली. त्यानंतर मदतकार्य करण्यासाठी प्रशासन तिथे पोहोचले होते. मात्र गाडी पाठीमागून कंटेनरमध्ये घुसल्याने त्यात मोठे अडथळे येत होते. अखेर क्रेन मागवून ती कार बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, गाडीतील मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला आहे. पुढच्या सीटवर जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा हे बसले होते अशी माहिती मिळत आहे. पाठीमागे त्यांची मुलगी बसली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेळके हे शिर्डीमधील एक मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांचे अनेक उद्योग होते. ते शिवनेका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते आणि तरुण उद्योजक होते. त्याचबरोबर त्यांचे अशोक खरात यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार देखील झाले होते.
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेळके यांचा हा अपघात होता की अजून काही घडले आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हा घातपात होता का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शेळके यांच्या निधनानंतर शिर्डीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. शेळके हे शिर्डीतील एक बडे प्रस्थ होते, त्यामुळे आता नागरिकांची गर्दी होत आहे. शेळके समर्थक गर्दी करताना दिसत आहेत. जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके या दोन्ही भावांच्या व्यवसायात अशोक खरात यांची पार्टनरशिप होती. अनेक व्यवसायात ते भागीदार होते. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायात देखील अशोक खरात आणि शेळके यांची पार्टनरशिप होती.
या अपघाताचे वृत्त समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ज्या प्रकारे हा अपघात झाला आहे, ते पाहता तो अपघात होता की घातपात अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे, असे वक्तव्य केले.
