आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा खनिज विकास निधीतून विकासकामांना मंजुरी
आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश
कोठारी येथील अंतर्गत रस्ते व जलनिस्सारण व्यवस्थेत होणार मोठी सुधारणा
कोठारीवासीयांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाच्या कामांना जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या निधीतून ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण कामांमुळे गावातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
कोठारी गावात अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता व बंदिस्त नालीचे बांधकाम मंजूर झाले आहे. या कामांतर्गत दिलीप पार्लेवार यांच्या घरापासून शेंडे यांच्या घरापर्यंत तसेच कवडू गुरु पासून आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक ते सचिन शेंडे पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व बंदिस्त नाली बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय छत्रपती चौक पासून मारुती बुटले यांच्या घरापर्यंत रस्ता व बंदिस्त नाली बांधकामाचे कामही मंजूर करण्यात आले आहे.या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी २.५० कोटी रुपये अशा एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांना लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या विकासकामांमुळे कोठारी गावातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते, पाणी निचरा व्यवस्था आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, चिखल आणि गैरसोयी दूर होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत या कामांना गती दिली असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्थानिक कोठारी ग्रामस्थांनी या कामांसाठी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कोठारी गावाच्या विकासासाठी सदैव आग्रही
कोठारी गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देत, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विविध महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, पोलिस स्टेशन इमारतीचे बांधकाम, सुसज्ज व्यायामशाळा, तसेच ईटोली–मानोरा–कोठारी–कवडजई या मार्गावरील सुमारे १ कोटी ५५ लाख रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम यांचा समावेश आहे. याशिवाय नायब तहसीलदार कार्यालय, संरक्षक भिंत व सिमेंट कॉंक्रीट रस्ते, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्या, विविध सिमेंट रस्त्यांचे जाळे, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रविदास महाराज समाजभवन तसेच हनुमान मंदिर परिसरातील सभागृह या कामांमुळे कोठारी गावाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहेत.
