सामूहिक वनहक्क व्यवस्थापन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

चंद्रपूर, दि. १० : सामूहिक वनहक्कांचे प्रभावी व्यवस्थापन, वनसंपत्तीचे संवर्धन आणि आदिवासी व पारंपरिक वननिवासींच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वनप्रबोधनी येथे ६ नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार आमदार करण देवतळे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश यांच्यासह जिल्हा अभिसरण समितीचे सदस्य व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत ग्रामसभांना प्राप्त सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन करणे, गावनिहाय व्यवस्थापन आराखडे तयार करणे तसेच विविध शासकीय विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यशाळेत चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील दहा तालुक्यांमधील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे सदस्य, ग्रामसभा प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, वनरक्षक तसेच तालुका अभिसरण समित्यांचे सदस्य सहभागी झाले. याशिवाय तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, लघुपाटबंधारे, महावितरण व भूमी अभिलेख विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यशाळेत मास्टर ट्रेनर अनुप जामोडकर आणि ललित भांडारकर यांनी सामूहिक वनहक्क व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. सामूहिक वनक्षेत्रांचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, ग्रामसभांच्या सहभागातून व्यवस्थापन आराखडे तयार करणे तसेच कृषी, वन, पशुसंवर्धन व इतर विभागांच्या योजनांचा समन्वय साधून गावांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत तांत्रिक व व्यावहारिक माहिती देण्यात आली. ग्रामसभांना प्राप्त वनहक्कांचा प्रभावी उपयोग करून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, उपजीविकेची साधने आणि वनसंपत्तीचे संरक्षण यांना चालना देण्याच्या दृष्टीनेही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आदिवासी विकास विभागांतर्गत नवनियुक्त शिक्षकांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांच्या पुढाकारातून विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देणे, डिजिटल माहितीचे प्रभावी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षितता, कार्यालयीन सुविधांचा विकास, कागदाचा कमीत कमी वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक कार्यालयीन कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला आहे. या गुणवत्तापूर्ण प्रशासकीय उपक्रमांची दखल घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयाला प्राप्त झालेले आयएसओ मानांकन प्रमाणपत्र पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

वनहक्क व्यवस्थापनाला मिळणार गती :
या कार्यशाळेमुळे ग्रामसभा, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या आणि विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वनहक्क व्यवस्थापन आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी, वनसंपत्तीचे संवर्धन आणि आदिवासी व पारंपरिक वननिवासींच्या शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक उपाययोजनांना चालना मिळणार आहे.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी राठोड, निदेशक के. एफ. कुळमेथे, जिल्हा व्यवस्थापक स्नेहा ददगाळ, तालुका व्यवस्थापक वैष्णवी साखरकर, एमआय सहाय्यक स्नेहा, खोब्रागडे, बांदुरकर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *