चंद्रपूर, दि. 30 : दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना, ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची खरेदी करावी. तसेच या बचतगटांचा उत्साह वाढवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी ही दिवाळी अनोख्या पदधतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केले जाणार आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्यालेत मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या महिलांकडून विविध स्वरुपाचे खादयपदार्थ तयार केले जात आहेत.
दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकतेच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या गणपती महोत्सव प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सर्व तालुका स्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसर तथा राणी हिराई उमेद मार्ट चंद्रपूर येथे दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार असून, यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे.
नागरिकांनी दिवाळीनिमित्त स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह तसेच जिल्हा अभियान सहसंचालक मंजिरी टकले यांनी केले आहे.
